न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२५) :- पुण्यातील गंगाधाम चौकात आज बुधवारी (दि. ११) सकाळी सिग्ग्रल सुटताच पुढे निघालेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धड़क दिल्याने सहप्रवासी महिलेचा जागीच मृत्यू आला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू व जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास गंगाधाम चौकात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१, रा. गंगाधाम चौक) हे दुचाकी चालवत होते व त्यांच्या पाठीमागे त्यांची सून दीपाली युवराज सोनी (वय २९) बसलेली होती. सिग्नल सुटताच दुचाकीस्वाराने पुढे जायचा प्रयत्न केला, परंतु मागून भरधाव आलेल्या ट्रकने दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकच्या चाकाखाली आल्यामुळे दीपाली सोनी यांचा जागीच मृत्यू झाला, जगदीश सोनी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर स्पायरल हॉस्पिटल, गंगाधाम येथे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ट्रकचालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय ५१, रा. भवानी पेठ, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर गंगाधाम चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.











