- रस्ता रुंदीकरण, डांबरीकरणासाठी केलं ‘रास्ता रोको’ आंदोलन..
- ‘पीएमआरडीए आणि पीडब्ल्यूडी’ची इभ्रत आणली चहाटयावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १३ जून २०२५) :- देहूगाव ते तीर्थक्षेत्र येलवाडी मार्गे तळेगाव- चाकण रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याला मान्सूनपूर्व पावसाने मोठे खड्डे पडले होते, या रस्त्याचे तातडीने डांबरीकरणासह रुंदीकरण करावे, यासाठी तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग कृती समिती व पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने येलवाडी प्रवेशद्वारासमोर नुकतेच रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
तळेगाव चाकण महामार्गाला जोडणारा देहूगाव ते येलवाडी-देहूफाटा हा मुख्य जोड रस्ता असून, तळेगाव व चाकण औद्योगिक वसाहत आहे. या ठिकाणी कामगारांची वाहतूक करणारी वाहने व कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक करणारी वाहने या रस्त्यावरून ये-जा करत असतात. त्यांना खड्याचा त्रास होत आहे.
देहूरोड विभागाचे भाजपा अध्यक्ष रघुवीर शेलार, संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, येलवाडी गावचे माजी सरपंच व कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, विद्यमान उपसरपंच ऊर्मिला गायकवाड, कृती समितीचे दिलीप डोळस, करवीर शिवलिंग तसेच इतर खासगी कंपनीच्या कामगारांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी रमेश बोत्रे, महेश बोत्रे सहभागी झाले होते.
श्री संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला देहूमध्ये व भंडारा डोंगर येथे तुकाराम बीज यात्रा, आषाढी पालखी सोहळा व कार्तिकी एकादशी यात्रा आशा तीन यात्रा भरतात. वर्षभरात मोठ्या संख्येने वारकरी व भाविक या मार्गाने येत जात असतात. या ठिकाणी पीएमआरडीएचे सुरेश कानडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाही अभियंता आश्विनी पाटील उपस्थित होत्या व त्यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे घेऊन त्यांनी निवेदनही स्वीकारले.
रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनाला नागरिक कंटाळले…
या रस्त्यावरील खड्डे बुजावावेत, अशी प्रशासनाकडे वारंवार नागरिकांकडून मागणी केली जात आहे. परंतु त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. रस्ता दुरुस्तीबाबत केवळ आश्वासनच दिली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.











