- अंतिम प्रभाग रचना ४ सप्टेंबरला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १३ जून २०२५) :- राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर केले आहे. यामध्ये २२ जुलै रोजी प्रारूप तर ४ सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील २९ महापालिकांना आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश काढले. यानंतर नगरविकास विभागाने गुरुवारी चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार ११ ते १६ जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणे, प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, १७ आणि १८ जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी करणे, १९ ते २३ जून स्थळपाहणी करणे, २४ ते ३० जून गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, १ ते ३ जुलैला नकाशात निश्चित केलेल्या प्रभागातील जागेवर जाऊन तपासणी करणे, ४ ते ७ जुलै प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे, ८ ते १० जुलैदरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे, त्याला राज्य निवडणूक आयोग अथवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, २२ जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, ३१ जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागविणे, ०१ ते ११ ऑगस्ट प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, १२ ते १८ ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास पाठविणे, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या शिफारशींवर निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका आयुक्तांना कळविणे, २९ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
निवडणुका दिवाळीनंतरच…
राज्य सरकारने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार ४ सप्टेंबरपर्यंत प्रभागांची रचना जाहीर होणार आहे. ही अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षण सोडत होईल. त्यानंतर कधीही महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात. शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा या दिवाळीपूर्वी असतात; त्यामुळे निवडणूक घ्यायची झाल्यास मतदान केंद्र, मतदान अधिकारी म्हणून शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ड्युटी लावणे अडचणीचे होणार आहे. महापालिकांच्या निवडणुका या दिवाळीनंतर म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.















