न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२५) :- कात्रजमधील सुखसागर नगर येथे भरधाव कारने पदपथावरून जाणाऱ्या तरुणीला धडक दिल्याची घटना शुक्रवारी घडली. गाडीचा वेग ऐवढा जास्त होता की कार आणि पदपथावरील झाड याच्यामध्ये अडकून श्रेया येवले (वय २१) या तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेतले आहे.
सुखसागर नगर येथील सोसायटीच्या समोर शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. श्रेया येवले ही तरुणी नारळाचे झाड तोडून पदपथावरून जात होती. या दरम्यान भरधाव कार पदपथावर घुसली आणि श्रेयाला धडक दिली. पदपथावरील बदामाचे झाड आणि कार यात अडकून श्रेयाचा मृत्यू झाला.
श्रेया ही कोंढवामधील शीतल हाईट्स येथे राहत होती. अपघातानंतर बिबवेवाडी, भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कारचालक सतीश होनमाने (वय ३७, गोकुळनगर) याला ताब्यात घेतले असून शीतलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.











