न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव (दि. १३ जून २०२५) :- देहू ते देहूरोड या पालखी मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी एक लाख वारकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार आहे, अशी माहिती हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देहू ते देहूरोड हा पालखी मार्ग अरुंद आहे. माळवाडी ते देहूरोड दरम्यान साडेतीन किलोमीटरचे अंतर असून, या ठिकाणी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची हद्द आहे. लष्करी छावणी असल्याने साडेतीन किलोमीटरचा रस्ता होण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्ड एनओसी देत नाही. त्यामुळे गेले अनेक वर्ष या रस्त्याचे रुंदीकरण रखडलेले आहे. त्यातच केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांनी देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाचे चौपदरीकरण सुरू केलेले आहे. काही ठिकाणी हे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत एनओसी मिळत नसल्यामुळे काम रेंगाळलेले आहे.
या मार्गावर सध्या हजारो वाहने ये-जा करतात. चाकण, तळेगाव एमआयडीसी आणि तळवडे आयटी पार्कमधील कामगार देहू ते देहूरोड या रस्त्याचा वापर करतात. त्यातच देहूमध्ये वर्षातून तीनवेळा यात्रेसाठी वारकरी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी दररोज होत आहे. देहू माळवाडी, झेंडेमळा, चिंचोली या गावातील स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास दररोज सहन करावा लागत आहे. त्यातच अनेक अपघातही होतात. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि ज्या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूत आले होते. त्या देहूसाठी नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे यासाठी वारकऱ्यांच्या एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन त्यांना देण्यात येणार आहे, असे गोलांडे यांनी सांगितले
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान १८ जूनला आहे. या दिवशी सकाळी ११ वाजता परंडवाल चौक येथे स्वाक्षऱ्यांची मोहीम सुरू होईल. तसेच दुसऱ्या दिवशी १९ जूनला पालखी देहूतून मार्गस्थ होताना वारकऱ्यांच्या भाविकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात येतील. ही मोहीम ग्रामस्थ यांच्या वतीने राबविण्यात येणार आहे.











