न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १५ जून २०२५) :- गेल्या शनिवारी पावसामुळे हिंजवडीत रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची मोठी अडचण झाली होती. याचे कारण हिंजवडी येथील टाटा मेट्रोच्या कामातील अडथळे आढळून आले. त्यामुळे येत्या सोमवारपर्यंत हे अडथळे दूर करण्यास सांगण्यात आले आहे.
हे काम यावेळेत पूर्ण न झाल्यास टाटाला १० कोटींचा दंड करण्याची सूचना पीएमआरडीएला देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विधानभवन येथे आयोजित आषाढी वारी पालखी सोहळा आढावा बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, या बैठकीत जिल्ह्यात झालेल्या पावसाबाबत माहिती घेतली. पुण्यात पुढच्या आठवड्यात पालखी येत आहे. त्यामुळे पावसामुळे पाणी साचणाऱ्या भागात दुरुस्ती करण्याबाबत सांगितले आहे. दिवे घाटात पाणी व चिखल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत असल्याचे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. पण त्या ठिकाणी काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असलेली पावसाळी गटारे व झालेला मोठा पाऊस यामुळे पाणी रस्त्यावर आले. मात्र, आज या गटारांची रुंदी व खोलीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालखी घाटातून जाताना अनेक जण डोंगरावर बसतात; पण या डोंगरावरील खडक ठिसूळ असल्याने जागोजागी बॅरिकेट्स लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवे घाट चढत असताना वारकऱ्यांना अडचण येणार नाही. घाटातील फ्लेक्स, जाहिरात फलक काढण्यास सांगितले आहे.












