न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १५ जून २०२५) :- पुण्यात अजित पवार यांचा कार्यक्रम सुरु असताना प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पोहचले. त्यांनी अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना न्याय द्या, अशा घोषणा दिल्या.
त्यावेळी अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी काल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. त्यानंतर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. तसेच फोनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे बच्चू कडूंसोबत करुन दिले. राज्य सरकार बच्चू कडू यांच्या मागण्यांसाठी समिती गठीत करणार आहे. त्या समितीत बच्चू कडू यांनाही घेण्यात येईल. ती समिती सरकारला अहवाल देईल. त्यानंतर ज्या मागण्या मान्य करणे शक्य असतील त्या मागण्या मान्य केल्या जातील, असे अजित पवार यांनी आंदोलकांना सांगितले.
अजित पवार यांच्या वक्तव्यानंतरही आंदोलकांचा गोंधळ सुरुच होता. त्यामुळे अजित पवार यांनी म्हटले, आम्हीसुद्धा शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. आम्हालाही वाटते, शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या मागण्या मान्य करण्यात याव्या. परंतु गोंधळ घालून काही होणार नाही. समिती नेमली जाणार आहे. त्यानुसार निर्णय होईल. त्यानंतर पोलिसांना आंदोलकांना बाहेर काढण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. दरम्यान, बच्चू कडू यांनी म्हटले की, कर्जमाफीसाठी सरकार समिती गठीत करू असे सांगत आहे. परंतु समिती केव्हा गठीत करणार आणि केव्हा कर्जमाफी होणार हे सांगितले पाहिजे.
















