न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०१९) :- देशातील लोकसभा २०१९ निवडणुकीचा निकाल लागला असून, या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षांना जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. जनतेने मोदी सरकारवर पून्हा एकदा प्रचंड विश्वास दाखविला आहे. या निकालाबाबत न्यूज पीसीएमसी ने शहरातील काही निवडक मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :-
आज जो जनतेने निकाल दिला आहे. त्या निकालाचा व जनाधाराचा आम्ही स्वीकार करतो. परंतु, हा निकाल आमच्यासाठी आश्चर्यजनक निकाल असून, या निकालाची कारणीमिमासा आम्ही काही दिवसात चर्चा करून शोधणार आहोत. तसेच विजयी उमेदवारांना पक्षाच्या वतीने शुभेच्छा देत आहोत. बाकी पुढील बैठकीत त्याबाबत दिशा ठरवू.
– सचिन साठे, शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
अपेक्षित निकाल लागला असून, आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभेतून महायुतीला मताधिक्य मिळवून दिले आहे. खा. बारणे यांना निवडून आणण्यात आ. जगताप याचा सिंहाचा वाटा आहे. लोकांनीही महायुतीवर पून्हा विश्वास दाखविला आहे.
– शेखर चिंचवडे, शहर भाजप
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांनी व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामधील शिवसैनिक व युतीचे पदाधिकारी यांनी कटिबद्ध राहुन उमेदवारांना जिंकवण्यासाठी तप्तर राहीले. या लोकसभेत शिवशाही व्यापारीसंघाचे सर्व पदाधिकारी तसेच अपक्ष उमेदवार डॉ. मिलींदराजे भोसले यांनी माघार घेऊन, शिवसेना उपनेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली युतीच्या उमेदवारांना पाठींबा देऊन, खंबीर साथ दिल्याबद्दल व शिवसैनिकांनी जिवाच रान करून विजय मिळविल्याबद्दल मनपूर्वक आभार व अभिनंदन.
– युवराज भगवान दाखले, शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा प्रदेश अध्यक्ष शिवशाही व्यापारीसंघ
विकासाच्या मुद्यांना बगल देत, राष्ट्रवाद, धर्म, हिंदुत्व व विविध भूलथापा देवून भाजप सत्तेवर आले आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने विकासाच्या मुद्द्यांवर लढवलेली निवडणूक यंदा जातीयवादावर पार पडली. त्यात इव्हीएमवर शंका उपस्थित होत आहे.
– हेमंत डांगे शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर मनसे, विद्यार्थी सेना
जनतेचा कौल मान्य आहे. देशात वाढलेल्या बेरोजगारीच्या मोदींना शुभेच्छ्या. त्यांनी देशात वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी थांबवावी. तसेच सरकारने दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी उपाययोजना कराव्यात. केवळ गाजरांचे आश्वासन पून्हा नको.
– संदीप चिंचवडे, शहर राष्ट्रवादी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. कारण ५ वर्षे विकासकामे करण्यास वेळ कमी पडला. मोदींनी ज्या योजना आणल्या त्या येत्या कार्यकाळात जनतेपर्यंत पोहचतील. पंतप्रधान मोदी अपूर्ण राहिलेले कामे पूर्ण करतील. मावळमध्ये आप्पा बारणे यांना पुन्हा संधी दिली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या नातवाचा हट्ट पुरवला पण जनतेने नाकारला. राष्ट्रवादीला जनतेने हद्दपार केले आहे. जनता जनार्दन आहे. युतीच्या कार्यकर्त्यांनी झोकून काम केले.
– संतोष सौंदणकर, सदस्य विद्युत सनियंत्रण समिती पुणे जिल्हा
मोदींनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे जनतेमध्ये आपण व आपला देश सुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली व मोदीजी अजुनच लोकप्रिय झाले. त्यांनी देशभक्तीचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक लढवली. हा मुद्दा जनतेला आवडला. पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रश्न सोडवण्यात यशस्वी झाले त्यामुळे आपल्या देशाला जागतिक पातळीवर उच्चस्थानांतर नेवून ठेवला. देशात जीएसटी आणून एक आर्थिक घडी बसवली. याचा फायदा अप्रत्यक्षपणे व्यवसायाला झाला. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे अजून राजकारणात अपरिपक्व आहे. त्यांच्यात अजून समजूतदारपणा येण्याची गरज आहे. जनतेने घरानेशाही नाकारलेली आहे. जनतेने बीजेपी ला निवडून देऊन आपला देश सुरक्षित हातात दिला आहे
– सीए बबन डांगले, माजी अध्यक्ष सीए संघटना पिंपरी चिंचवड
भाजपचे सरकार हे बहुमताने सत्तेत आले. मोदी हे देशहित, आर्थिक निर्णय, जागतिक स्तरावर प्रश्न आता मार्गी लागतील. मोदींनी जनतेला जे आश्वासने दिले होते ते सर्व पूर्ण करतील. उत्पादन क्षमता, वाढती बेरोजगारी, आर्थिक शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलतील. खऱ्या अर्थाने अच्छे दिन येतील, अशी अपेक्षा बाळगू. देशहितासाठी सत्ताधार्यांसोबत विरोधी पक्ष सक्षम असणे गरजेचे असते. सक्षम विरोधीपक्ष नसणे हे लोकशाहीसाठी धोकादायक असते, असे मला वाटत.
– संतोष संचेती अध्यक्ष, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट पिं. चिं. शाखा











