न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०१९) :- शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये तीन वेळा शिवसेनेकडून खासदार राहीलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांचा आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे यांनी सुफडासाफ करत दणदणीत विजय मिळविला. डॉ.अमोल कोल्हे यांच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी साने चौकात भंडाऱ्याची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला.
दत्ता साने म्हणाले की, आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची आम्ही जबाबदारी स्विकारली होती. त्यानुसार झपाट्याने कामाला सुरुवात केली. दिवसरात्र एक करून भोसरी मतदार संघात जोरदार प्रचार केला. डॉ. अमोल कोल्हे हे उत्कृष्ट अभिनेते आणि वक्ते असल्यामुळे त्याचाही फायदा त्यांना झाला. त्यांच्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमुळे अबालवृध्दांवर जादू झाली होती. खरे संभाजी म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत होते.
भोसरी मतदारसंघात आम्ही त्यांच्या प्रचाराची रॅली काढली तेव्हा अनेक महिलांनी अमोल कोल्हे यांचे दर्शन घेतले होते. जोरदार प्रचार आणि उत्कृष्ट अभिनयाला मिळालेले प्रेम यांमुळे कोल्हे यांना यश गाठता आले आहे. भोसरी मतदार संघात माझ्यासोबतच माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक, कार्यकर्ते यांनीही यश मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, असेही साने यांनी सांगितले.











