- चिखली पहिला तर सांगवी होणार शेवटचा प्रभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२५) :- प्रभाग पुनर्रचनेबाबत कालबद्ध कार्यक्रमाचा आदेश धडकताच पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने बुधवार (दि. ११) पासून कार्यवाही सुरू केली. पहिल्या टप्प्यातील प्रगणक गटांच्या मांडणीला प्रारंभ झाला. नऊ टप्प्यांतील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून राज्य निवडणूक आयुक्तांकडून अंतिम मंजुरी मिळाली की, २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत म्हणजे जूनपासून तीन महिन्यांच्या कालमर्यादेत प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर होईल, प्रभाग रचना शहरातील उत्तर दिशेकडून म्हणजेच चिखलीतून सुरू होणार आहे. चिखली हा पहिला तर सांगवी हा शेवटचा प्रभाग असणार आहे.
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार राज्य शासनाने अ, ब, क, ड वर्गाच्या महानगर पालिकांच्या प्रभाग रचनेचा आदेश मंगळवारी (दि. १०) जारी केला. कालबद्ध कार्यक्रमामध्ये नमूद केलेल्या कालावधीनुसार टप्पेनिहाय कार्यवाही पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी व घोषित कालमर्यादा पाळण्यासाठी कोणती सवलत नाही. त्यानुसार, प्रथम टप्प्यातील ११ ते १६ जून २०२५ पर्यंत पूर्ण करायची प्रगणक गटांच्या मांडणीबाबत कार्यवाही सुरू केली आहे. दुसऱ्या टप्प्यात जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी, स्थळ पाहणी, गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशे तयार करणे, नकाशा निश्चित केलेल्या प्रभाग हद्द तपासणी, प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर स्वाक्षरी करण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. कालमर्यादा पाळण्याच्या दृष्टीने महापालिका अधिनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांची लवकरच नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देणार आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा गूगल मॅपद्वारे प्रभागांची रचना करण्यात आली. त्यापूर्वी प्रभाग रचना निश्चित करताना कागदावर नकाशे काढले जात. त्यात प्रभागांची हद्द निश्चित करण्यासाठी नदी, नाले, ओढे या नैसर्गिक हद्दीबरोबरच रस्त्यांचा विचार केला जात असे. मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होत असे. राजकीय बळ वापरून हवी तशी प्रभाग रचना करण्याचे प्रकार घडत होते. त्याला पायबंद घालण्यासाठी निवडणूक आयोगाने गूगल मॅपद्वारे प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता प्रभागरचनेमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नसल्याचा दावा प्रशासन करत आहे.
प्रभाग रचनेची सुरूवात शहराच्या उत्तर दिशेकडून होत आहे. उत्तरेकडून ईशान्य उत्तर-पूर्व त्यानंतर पूर्ण दिशेकडे येऊन पूर्वे कडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत सरकून शेवट दक्षिणेकडे होणार आहे. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने दिले जाणार आहे. इमारत-चाळी व घरांचे विभाजन दोन प्रभागात होणार नाही. प्रभाग रचना करताना लोकसंख्या भागिले महापालिकेची एकूण सदस्य संख्या गुणिले संबंधित निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या या सूत्रानुसार एका प्रभागात समाविष्ट करावयाची सरासरी लोकसंख्या निश्चित केली जाईल. प्रगणक गट न फोडल्याने प्रभागाची लोकसंख्या अनुज्ञेय मयदिपेक्षा कमी वा जास्त होत असल्यास, त्याची कारणे प्रभाग रचनेच्या प्रस्तावात नमूद करावे लागेल.
शहराच्या उत्तर दिशेने प्रभागरचना सुरू करण्यात येणार आहे. शहरातील चिखली भागातून सुरूवात करून शेवट सांगवी मध्ये होणार आहे. मुख्य रस्ते, नैसर्गिक नाले, नदी यांचा विचार केला जाणार आहे. कालमर्यादेत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त…















