न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२५) :- वडील आणि मुलीमधील नातं हे शब्दांत पूर्ण मांडता येणे अशक्यच. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वडिलांचा आधार, त्यांच्या शांत आणि समंजस प्रेमाची उब असते. या नात्याला समर्पित एक भावनिक गीत फादर्स डेच्या निमित्ताने रसिकांच्या मनाला स्पर्श करत आहे.
‘अवकारिका’या आगामी मराठी चित्रपटातील हे गीत सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांच्या आवाजात आहे. चित्रपटाचे निर्माते व गीतकार अरविंद भोसेले यांनी लिहिलेल्या आणि श्रेयस देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचे बोल आहेत…
“का रे बाबा, का रे पप्पा..
कुठे हरवल्या तुझ्या छान-छान गप्पा…
तू सांग ना तू सांग ना…
तू सांग ना…
हे गीत ऐकताना अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळते. वडिलांचे स्थान, त्यांच्या आठवणी आणि त्यांच्यावरील प्रेम, हे शब्दांच्या माध्यमातून मांडणं सोपं नसतानाही हे गीत नेमकं हाच भाव नकळत व्यक्त करतं. ‘फादर्स डे’च्या पार्श्वभूमीवर हे गीत सोशल मीडियावर कल्ला करत आहे. फादर्स डे म्हणजे केवळ भेटवस्तू किंवा सेलिब्रेशन नव्हे, तर आपल्या वडिलांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण, त्यांच्यासोबतचा बंध आणि नात्याची गहिवरलेली जाणीव असते.
रेडबड मोशन पिक्चर्स आणि बॅनरखाली बनलेला ‘अवकारिका’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अरुण जाधव, निर्माते भारत टिळेकर, आणि सहनिर्माते मनोज गायकवाड, मृणाल कानडे, गीताली सिंग आहेत. आपणही या गीताच्या माध्यमातून फादर्स डेच्या शुभेच्छा देऊ शकता किंवा आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देऊ शकता.











