- पिंपरी-चिंचवडचे अति. तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे प्रभारी कार्यभार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ जून २०२५) :- टाटा पॉवर कंपनीची जमीन बेकायदा खासगी व्यक्तीच्या नावे करण्याचा उद्योग मुळशीचे तहसीलदार रणजित भोसले यांच्या अंगलट आला आहे. याप्रकरणी राज्य सरकारने त्यांचे निलंबन केले असून, त्यांनी दिलेले आदेशही रद्द करण्यात आले आहेत. अतिरिक्त सचिव प्रवीण पाटील यांनी हे आदेश जारी केले आहेत.
रणजित भोसले हे मुळशीचे तहसीलदार पदावर कार्यरत असताना ‘दी टाटा पॉवर कंपनी लि.’ या कंपनीचे नाव कमी करून धोंडू गोपाल ढोरे यांच्या मालकी हक्काचे आदेश करून नाव दाखल करून अनियमितता केली. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयाने २० मार्च रोजी या प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला. भोसले यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४९, १५० व १५५ अन्वये दिलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत.
या अनियमिततेबाबत अतिरिक्त विभागीय आयुक्तांच्या स्तरावर चौकशी करण्यात आली. हा चौकशी अहवाल १२ एप्रिल रोजी राज्य सरकारला सादर करण्यात आला. त्यामध्ये अनियमितता झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. याप्रकरणी ८५ वर्षांपेक्षा अधिक विलंब झाला आहे, हे विचारात न घेता अंतिम निर्णय देण्याची कार्यवाही कायदेशीर नाही. अशा प्रकारे शासकीय कर्तव्य पार पाडताना गुणवत्ता व औचित्य न ठेवल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन झाल्याने भोसले यांची विभागीय चौकशीची कारवाई करण्यात येणार आहे.
त्यानुसार भोसले यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे, असे आदेश अतिरिक्त सचिव प्रवीण पाटील यांनी जारी केले आहेत. आदेश अमलात असेपर्यंत भोसले यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय राहील व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. भोसले यांच्या जागी पिंपरी-चिंचवडचे अतिरिक्त तहसीलदार जयराज देशमुख यांना प्रभारी कार्यभार दिला आहे.











