- लोक शहाणे आहेत, लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकली..
- शरद पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये पालिका निवडणुकीचे फुंकले रणशिंग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२५) :- जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढं ही टिकून राहणार आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे. विकास असा करायचा आहे, ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. यासाठी संघटन मजबूत करावी लागेल, असे शरद पवार यांनी सांगितले.
सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, असे वारंवार म्हटले जात आहे. पण सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ. पण जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले. ते मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येण्याच्या आशा मावळल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘तुम्ही निवडणुकीची काळजी करु नका. आपल्यासोबत जो येणार असेल, ते आपल्या विचारांशी जोडून राहणार असतील तर त्यांचा विचार वरिष्ठ करतील. मी तुम्हाला विश्वास देतो. आगामी महापालिका निवडणुकीबाबत तुम्ही चिंताच करू नका, असे सांगत शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर देत त्यांना लढण्यासाठी बळ देण्याचा प्रयत्न केला. रांजणगावला ही आम्ही औद्योगिक नगरी बनवलं. चाकण, बारामती, इंदापूर, अशा अनेक ठिकाणी औद्योगिक पट्टा निर्माण केला. पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूला हे औद्योगिक आणण्यासासाठी आम्ही झटलो. आज स्थिती वेगळी आहे. आता इथलं राजकारण, समाजकारण बदललं आहे. इथले नेतृत्व अण्णासाहेब मगर, मग आम्ही, त्यानंतर रामकृष्ण मोरे यांनी या शहराचा चेहरा बदलण्यासाठी कष्ट घेतले. यामागे गांधी-नेहरूंचे विचार महत्वाचे ठरले. त्यांनी विकासाची गंगा आणली अन हीच विकासाची गाडी आपल्याला पुढे न्यायची आहे. जी अनधिकृत बांधकाम आहेत, ती टिकायला हवीत. नव्यानं अनधिकृत बांधकामे होऊ देऊ नका, पण जी पूर्वी झालीत ती टिकायला हवीत. रस्त्याच्या पलीकडे एक अन अलीकडे एक असा एक नवा व्यवसाय पिंपरी चिंचवडमध्ये सुरु झाला. हा व्यवसाय आपल्याला स्वच्छ करायचा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले,











