न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- शिवसेना, भाजप, आरपीआय (आठवले गट) या पक्षांनी एकजुटीने काम करत पाळलेला युतीधर्म, खासदार म्हणून पाच वर्षात केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम. तसेच मोदी लाटेच्या आधारावर श्रीरंग बारणे यांनी शरद पवार यांच्या कुटुंबातील उमेदवाराला सुमारे सव्वादोन लाखांच्या मताधिक्याने हरवून दुस-यांदा विजय मिळविला आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. या मतदारसंघात झोपडपट्टी व सुशिक्षित असा दोन्ही मतदार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लक्ष्मीदर्शन करूनही खासदार बारणे यांच्या आत्मविश्वासाने व शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी चिकाटीने पूर्ण मतदारसंघात केलेल्या प्रचारामुळे, भाजप-युतीच्या एकजुटीमुळे बारणे यांना मताधिक्य मिळाले. दापोडीतील आरपीआयच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांचाही त्यांना फायदा झाला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी बारणेबरोबरचा वाद मिटवून पक्षादेश मान्य करत बारणे यांचे काम केले. थेरगाव पट्ट्यातील भाजपच्या काही नगरसेवकांनी धडकपणे पार्थचा प्रचार केला, परंतु यामागे त्यांच्यात वैयक्तिक वादाची किनार होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनीही बारणे यांचे काम केले. वडगाव मावळ लोकसभा मतदारसंघ हा भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातही भाजप-सेनेची एकजूट राहिली व सर्वांनी युतीधर्म पाळला.
मावळ लोकसभेसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. त्यांपैकी मुख्य लढत ही भाजप-शिवसेना युती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी अशी होती. बारणे यांचे मताधिक्य लक्षात घेता बहजन वंचित आघाडीच्या राजाराम पाटील यांच्या उमेदवारीचा फारसा फरक पडला नसल्याचे स्पष्ट होते.











