- राष्ट्रवादीच्या बलाढ्य बालेकिल्ल्यात पूर्वीच्याच परंतु, आता विरोधक
- ”राष्ट्रवादी कट्टर भक्तांनीही” कोणतीही दयामाया दाखविली नाही
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- पार्थ पवार यांच्या उमेदवारीला खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘पवार कुटुंबातील किती जणांनी निवडणूक लढवायची? पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकत्यांनी काय करायचे’, असे जाहीर मतप्रदर्शन करून, विरोध दर्शविला होता. परंतु, कौटुंबिक हट्टापायी अजित पवार यांनी बालहट्ट पुरवीत पार्थची उमेदवारी हा प्रतिष्ठेचा विषय केला. कार्यकत्यांमधूनच मागणी होत असल्याने शेवटी स्वत: शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याचा निर्णय थांबवून, पार्थची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, पार्थ पवार यांची उमेदवारी सरुवातीपासूनच वादग्रस्त ठरत गेली.
मावळ मतदारसंघात घाटावर पिंपरी, चिंचवड व वडगाव मावळ हे तीन व घाटाखाली उरण, कर्जत व पनवेल हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन भाजपचे, दोन शिवसेनेचे व एक राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे. तसेच या मतदारसंघामधील पिंपरी चिंचवड व पनवेल या मतदारसंघात दोन महापालिका व भाजप शिवसेनेचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच मागील दोन्ही वेळी शिवसेनेचेच खासदार निवडुन आले आहेत. त्यातच वडगाव मावळ लोकसभा मतदारसंघ हा भाजप-शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
त्यामुळे शत्रू पक्षाच्या बलाढ्य बालेकिल्ल्यात पार्थ पवार यांचा विरोधकांनी जे पूर्वीचे राष्ट्रवादीचे कट्टर भक्त, त्यांनीसुद्धा कोणतीही दयामाया न दाखवता, अगदी नियोजनबद्ध चक्रव्ह्यूव आखत लाखोंच्या मताधिक्याने पराभव केला. शरद पवार यांचे अनुभवाचे बोल एकूण अजित पवार यांनी उमेदवारीचा अट्टाहास सोडला असता तर, आज पवार घराण्याला पराभवाचे तोंड पहायची वेळ आली नसती व पार्थची ‘अभिमन्यू गत’ अवस्थाही झाली नसती.
भले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरेसवकांनी पार्थचे नेटाने काम केले, त्यात त्यांची भिस्त भाजपामधील बंडखोर नेते, तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करून नगरसेवक झालेल्या मंडळींवर होती. विशेषतः आ. लक्ष्मण जगताप आणि त्यांच्या ४५ समर्थक नगरसेवकांकडून पवार यांना छुपा पाठिंबा मिळेल, असे गृहित होते. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने तो डाव फसला. पिंपरी चिंचवडमधून नाना काटे, मयूर कलाटे, संजोग वाघेरे, विशाल वाकडकर, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे कधी नव्हे ते माजी मंत्री मदन बाफना, बाळासाहेब नेवाळे, बापू भेगडे, बबनराव भेगडे व काँग्रेसचे माऊली दाभाडे आदींनी एकजुटीने काम केले. परंतु, मतदारांनीच मोदींमुळे बारणेंना कौल दिला. त्यामुळे बारणे प्रचंड मताधिक्याने निवडून आले.















