- प्रभाग क्रमांक २२ मधून भाजपच्या इच्छुकांनी ठोकलाय शड्डू..
- काळेवाडीला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणू..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २१ जून २०२५) :- आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर सर्वच इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. त्या दृष्टीकोनातून काळेवाडी (प्रभाग क्रमांक २२) चा आढावा घेतला. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रामुख्याने भाजपा, रहाटणी-पिंपळे सौदागर मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, हर्षद नढे, कैलास सानप, मंगेश नढे, काळूराम नढे, रमेश काळे, विलास पाडळे, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर यांची नावे पुरुष गटात चर्चेत आहेत. तिकिटासाठी प्रामुख्याने यांच्यामध्येच सध्यातरी चुरस दिसून येत आहे. परंतु, आयत्यावेळी पक्षाने आयात उमेदवार दिल्यास या निष्ठावंतांचे काय होणार? अशा चर्चेला उधान आले आहे.
मागील काही वर्षांमध्ये काळेवाडी प्रभागाचा विकास पूर्णतः थांबला आहे. काळेवाडीला बकाल स्वरूप आले आहे. येथील नागरिकांच्या मूलभूत समस्या देखील सोडविल्या जात नाहीत. पुरेशा प्रमाणात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. विजेचा लपंडाव नेहमीच चालू असतो. रस्त्यांचे प्रश्न वर्षानुवर्ष तसेच अनुत्तरीत आहेत. महत्त्वाचे मुख्य रस्ते अडवल्यामुळे ते पूर्णत्वास गेलेले नाहीत. त्यामुळे वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे.
काळेवाडीत सुसज्ज असा महापालिकेचा एकही दवाखाना उपलब्ध नाही. पोलीस ठाण्याला जागा मिळत नाही. तसेच लोकांच्या राहत्या घरावरील आरक्षण हटवण्यास स्थानिक नगरसेवक अपयशी ठरलेत. त्यामुळे यंदाच्या महापालिका निवडणुकीत शंभर टक्के सत्ता परिवर्तन करणार, असं मत भाजपचे इच्छुक उमेदवार व्यक्त करीत आहेत. तसेच काम करणाऱ्या आणि जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या भाजपच्या उमेदवारांनाच मतदार निवडून आणतील, असा विश्वास त्यांनी ‘न्यूज पीसीएमसी’च्या प्रतिनिधीशी बोलताना दाखवला.
वर्षानुवर्षे काळेवाडीचा विकास रखडलेला आहे. काळेवाडीला पुन्हा विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम निवडून आल्यानंतर करण्यात येईल. लोकांच्या मूलभूत समस्या सोडवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणार. पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेतृत्व यावेळी निष्ठावंतांना नक्कीच न्याय देतील, यावर आमचा विश्वास आहे.
– सोमनाथ तापकीर, भाजपा, रहाटणी-पिंपळे सौदागर मंडल अध्यक्ष…














