न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघ माझे होम पिच आहे, असे गृहीत धरून प्रचारयंत्रणा फारशी प्रभावीपणे राबविली नाही. पक्षसंघटना मजबूत नसल्यामुळे काही गावांत मतदारांपर्यंत कार्यकर्ते पोहोचले नाहीत. त्याचा फटका त्यांना बसला. गेल्या निवडणुकीत शिरूर-हवेली या विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना जवळपास ५३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य पूर्णपणे घटून डॉ. कोल्हे यांना २६ हजार ३०५ चे मताधिक्य मिळाले.
आढळराव पाटील यांना सलग तीनदा मताधिक्य देणाच्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून या वेळी कोल्हे यांना निर्णायक ७ हजार ४४६ मतांचे मताधिक्य मिळाले. या निकालाने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात राजकीय आडाखे बदलणार आहेत. सलग तीन वेळा वाढते मताधिक्य घेऊन आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना थेट आव्हान देऊन प्रत्येक वेळी जेरीस आणले होते. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेड तालुक्यातील गट-तटाचे राजकारण त्यांना लागू पडले नाही. उलट राष्ट्रवादीने एकदिलाने झटून काम केले.
दहा गांव दुसरी तवा एक गाव भोसरी मतदारसंघ असा नावलौकीक असणा-या भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांना ३७ हजार ७७ मताधिक्य मिळाले आहे. शिवसेनेची परंपरागत मते व भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी प्रामाणिकपणे पाळलेला युतीधर्म यामुळेच आढळराव यांना मताधिक्य मिळाले आहे. शिरूर लोकसभेमधील सहाही विधानसभा मतदारसंघांत आढळराव यांना हे सर्वाधिक मताधिक्य आहे.
हडपसर मतदारसंघात भाजपचे आमदार योगेश टिळेकर व शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर व सेना भाजपचे नगरसेवक आहेत, तरीही आढळरावांना म्हणावी तशी मतांची आघाडी मिळू शकली नाही. त्यांना या मतदारसंघात केवळ ५ हजार ३७० मतांची आघाडी मिळाली. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक, मजबूत सहकारक्षेत्र, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शरद पवार व अजित पवार यांच्या आदेशाप्रमाणे प्रामाणिकपणे काम केल्याचे दिसले.
जुन्नर विधानसभा मतदारसंघात अमोल कोल्हे यांना ४४ हजार ५५१ मताधिक्य मिळाले. जुन्नर तालुक्यातून मागील पंचवार्षिक (२०१४) मध्ये शिवाजीराव आढळराव यांनी देवदत्त निकम यांच्याविरोधात २५ हजार ५४४ एवढे मताधिक्य मिळविले होते. मात्र या निवडणुकीत डॉ. कोल्हे यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील मतदारांनी त्यांना मोठी साथ दिली आहे.















