दर्शनासाठी भाविकांची गर्दी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
कामशेत (दि. 25 जून 2025) :- मावळ तालुक्यातील कामशेत येथील जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत टेकडीवर पुरातन शिवपिंड सापडली आहे. याठिकाणी काही ग्रामस्थ वृक्षारोपण करीत असताना जमिनीत वृक्षारोपणासाठी खड्डा घेताना ही पिंड निदर्शनास आली. शिवपिंड आढळून आल्याने कामशेत शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून शिवभक्त येथे दर्शनाला येऊ लागले आहेत.
पवन मावळ, नाणे मावळ व आंदर मावळ असे तीन शिवकालीन मावळ मिळून आजचा मावळ तालुका बनलेला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या प्रथम टप्प्यात मावळातील दुर्ग जिंकून घेतले होते. यातील प्रत्येक दुर्गावर महादेव पिंडीची स्थापना महाराजांनी केली होती. आजही सर्व दुर्गावर महादेवाची मंदिरे स्थित असून इतिहासाची साक्ष देतात. दुर्ग सोडता मध्ययुगात अनेक मंदिरे सपाट पृष्ठभागावर देखील बांधण्यात आली.
यात वाघेश्वर मंदिर, कोंडेश्वर मंदिरासारखी अनेक मंदिरे मावळमध्ये आहेत. कालपरत्वे अनेक ठिकाणी भक्तांनी कोरून, बनवून ठेवलेल्या अनेक पिंडी मातीखाली गेल्या. इतिहास बुजला गेला. तरी नव्याने काही ठिकाणी सह्याद्रीचा इतिहास, श्रद्धा व आस्था असलेल्या पिंडी, समाधी शिलालेख समोर येत आहे, हे मोठे सकारात्मक चित्र आहे, असे इतिहास अभ्यासक प्रमोद बोराडे यांनी सांगितले.
संकल्प से सिद्धी तक या कार्यक्रमांतर्गत कामशेत शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम चालू असताना झाडे लावण्यासाठी खड्डा घेत असताना हे शिवलिंग दिसून आले. शिवलिंग असल्यामुळे आम्ही इतिहासकार यांना याची कल्पना दिली. हे शिवपिंड मध्ययुगीन असल्याचे समजले, अशी प्रतिक्रिया भाजपा मंडल अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी दिली.
कामशेत येथील नव्याने उजेडात आलेली शिवपिंड एक अस्सल ऐतिहासिक मध्ययुगीन पिंड असून कालौघात मातीखाली गेली होती. खडकाळा हा ऐतिहासिक भाग असून येथील खिंडीत जनमानसाचे भक्तीस्थान असलेले महादेवाचे जुने देवस्थान होते हे समोर येत आहे.
– डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास संशोधक…










