न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जुलै २०२५) :- महापालिकेकडून दिली जाणारी मालमत्ता कर सवलत ही केवळ कागदोपत्रीच असल्याचा आरोप वाकड व ताथवडे परिसरातील नागरिकांनी केला आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे महिनाभर आधी सादर करूनही आता महापालिकेचे अधिकारी अनावश्यक कारणे देत सवलत नाकारत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गृहनिर्माण सोसायटीकडे एसटीपी, ओडब्ल्यूसी व सौरऊर्जा प्रकल्प या सर्व सुविधा आहेत. मात्र महापालिका केवळ सवलत न देण्याच्या पद्धती शोधत आहे. आता केवळ सहा दिवसांत कर भरण्याची अंतिम मुदत असताना, अचानक पालिकेकडून सोसायटीतील सर्व ९०० रहिवाशांचे मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी आवश्यक आहेत, अशी मागणी करण्यात येत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. महिनाभर आधी सर्व कागदपत्रे सादर करूनही आता नवीन अडथळे समोर आणणे म्हणजे नागरिकांची फसवणूकच आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर वाकड व ताथवडे येथील नागरिकांनी पालिका आयुक्त व संबंधित मालमत्ता कर विभागाशी तातडीने संपर्क साधण्याची गरज व्यक्त केली आहे. सवलतीचे आश्वासन देऊन त्या नागरिकांना मिळू नयेत यासाठी प्रत्यक्षात अडथळे निर्माण करणे ही नागरिकांची शुद्ध फसवणूक असून आम्ही आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करू, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
















