न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. 05 जुलै 2025) :- हिंजवडी आयटीनगरी परिसरातील गावे शेजारच्या महापालिकेत न घेता त्यांची स्वतंत्र नगरपालिका करा, अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी, आता मुळशी तालुका काँग्रेस सरसावली असून, खासदार सुप्रिया सुळे यांना शुक्रवारी त्याबाबत निवेदन देण्यात आले.
हिंजवडी येथे झालेल्या आढावा बैठकीत तालुकाध्यक्ष सुरेश पारखी यांनी सुळे यांना भेटून मागणीचे निवेदन दिले. माण-हिंजवडी राजीव गांधी इन्फोटेक पार्क जागतिक दर्जाचे आयटी हब आहे. याचा शेजारच्या महापालिकेत समावेश केल्यास ती ओळख संपुष्टात येईल, असे निवेदनात नमूद केले आहे.
शुक्रवारी (दि. ४) सकाळी हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी आयटी परिसरात कार्यरत प्रशासकीय यंत्रणा, सोसायटीधारक, आयटीयन्स, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. आयटी परिसरात भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचा यावेळी पाढा वाचण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिका ही मोठी असल्याने समाविष्ट गावांचा जलदगतीने विकास करणे अवघड होईल. त्यामुळे, माण हिंजवडीजवळील इतर गावे मिळून स्वतंत्र नगरपालिका झाली तर विकास करणे सोपे जाईल, अशी स्थानिक नागरिकांची मागणी असल्याचे सुप्रिया सुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.