- सामाजिक जबाबदारीचे भान राखत उपेक्षितांना दिला ‘एक हात मदतीचा’..
- दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांचा मिळाला भरभरून आशीर्वाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ०६ जुलै २०२५) :- चिखली-मोरेवस्ती प्रभाग क्रमांक १ येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपा युवा नेते पांडाभाऊ साने यांचा यंदाचा वाढदिवस साधेपणाने आणि विधायक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सामाजिक जबाबदारीचे भान राखत उपेक्षितांना ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेला अनुसरून विविध ठिकाणी मदतकार्य करण्यात आले.
आमदार महेशदादा लांडगे यांच्या कृपाशिर्वादासह नवदुर्गा सखी मंचच्या संस्थापिका, अध्यक्षा रुपालीताई साने, प्रभागातील माजी नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या वर्षीचा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा व्हावा अशी त्यांची व त्यांच्या सहकाऱ्यांची इच्छा होती. मावळ तालुक्यातील गुरुनानक आनंद वृद्धाश्रम येथील जेष्ठ नागरिकांना त्यांनी किराणा सामान, कपडे, थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार ब्लॅंकेटचे वाटप केले. तसेच रावेत येथील झुंज दिव्यांग प्रशिक्षण संस्थेतील अंध, अपंग व अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य करण्यात आले.
पांडाभाऊ साने म्हणाले, ‘वृद्धाशी संवाद साधताना मन अगदी हेलकावून गेले होते. चांगल्या घरातील आणि मोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्या मुलांचे आई-वडील उरलेले आयुष्य वृद्धाश्रमात जगत आहेत, हे दृश्य पाहून अंतःकरण भरून डोळ्यात पाणी आलं. जेष्ठांबरोबर माझा वाढदिवस साजरा झाला. त्याचबरोबर त्यांचे आशिर्वाद देखील मला मिळाले. त्यांच्यातील माणुसपण मला समजून घेता आला. तर, दुसरीकडे देवाने जसे दिले तसे शरीर व त्याबरोबर दिलेले अपंगत्व घेउन येथील विद्यार्थी कशाचीही चिंता न करता खूप काही या संस्थेत शिकत आहेत. भविष्यात आम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू, असा त्यांचा मनोदय पाहून खरंच खूप उत्साह आणि आत्मविश्वास या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. अनावश्यक खर्च करून वाढदिवस साजरा करण्यापेक्षा यंदा जेष्ठांच्या आणि दिव्यांगांच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करता आला याचा आनंद विरळच आहे.












