न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०६ जुलै २०२५) :- आषाढी एकादशीचे औचित्य साधून चॅलेंजर पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर येथे भक्तीभावात व संस्कारमय वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या वंदनगीताने झाली. त्यानंतर पंढरपूरच्या वारीचा महिमा सांगणारे मार्गदर्शन शाळेचे संचालक संदीप काटे सरांनी केले.
शाळेच्या शिक्षिका अभिलाषा सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी भक्त पुंडलिक हे नाटक साजरे केले. तसेच विद्यार्थ्यांनी फुगड्या, भारुड, अभंगगायन, तसेच विठ्ठल-रुखमाईच्या झाकी सादर करून वारकरी संप्रदायातील संस्कृतीचे दर्शन घडवले. शाळेच्या प्रांगणात “वारी” चे अनुकरण करत विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा माऊली तुकाराम ” च्या जयघोषात वारी केली.
तसेच शाळेच्या उपसंचालिका अनिता काटे यांनी देखील विध्यार्थ्यांसोबत वारीत सहभाग घेतला. त्याच बरोबर त्यांनी विध्यार्थ्यांना “भक्त पुंडलिका” ची गोष्ट सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. पिंपळे सौदागर गावच्या वारीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, शिवसाई लेनची सर्व मंडळी उपस्थित होती.












