न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०७ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे सामान्य प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, कायदा, कामगार कल्याण, आकाशचिन्ह व परवाना आणि नागरी सुविधा केंद्र या विभागांचे संपूर्ण कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मध्यवर्ती अतिक्रमण विरोधी विभाग, अग्निशमन विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त लोणकर यांची पदोन्नतीने सहआयुक्तपदी बढती झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, कायदा, कामगार कल्याण, आकाशचिन्ह व परवाना आणि नागरी सुविधा केंद्र या विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या संदर्भातील आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी गुरूवारी (दि. ३) काढला आहे.
लोणकर यांच्याकडे अग्निशमन विभाग आणि अतिक्रमण विभाग देण्यात आलेला नाही. त्यामुळे ते विभाग कोणाकडे सोपविले जाणार याची उत्सुकता महापालिका वर्तुळात निर्माण झाली आहे.
तत्कालीन सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याप्रमाणे नवनियुक्त सहआयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे कायदा विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. चौथ्या मजल्यावरील कायदा विभागाच्या दालनाचा अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी परस्पर ताबा घेतला आहे. कायदा विभाग सहआयुक्त लोणकर यांच्याकडे आल्याने सांडभोर यांना ते दालन सोडावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा तिसऱ्या मजल्यावरील उपमहापौराचे दालन घेण्याची वेळ येऊ शकते.


















