- उपचारासाठी गरीब रुग्णांना मिळणार देगणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०७ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शहर तसेच, राज्यभरातून गोरगरीब व सर्वसामान्य गरजू रुग्ण उपचार घेतात. गरजू रुग्णांना तातडीने उपचार तसेच, महागडी औषधे व साहित्य मिळावीत म्हणून ठाणे महापालिकेच्या धर्तीवर तेथे गरजू रुग्ण सहाय्यता निधी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. ती संस्था दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, रोटरी क्लब, नागरिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून तसेच, देणगीदारांकडून निधी स्वीकारणार आहे. त्या निधीतून गरजू रुग्णांवर उपचार केले जातील.
वायसीएम हे ७५० बेड क्षमतेचे रुग्णालय असून, ते १७ मार्च १९८९ पासून सुरू आहे. तेथे शहर तसेच, राज्यभरातील रुग्ण उपचार घेतात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरीब रुग्णांना रुग्णालयाचे शुल्क भरणे शक्य होत नाही. काही वेळा अत्यावश्यक लागणाऱ्या बाबी व काही महत्त्वाच्या, महागड्या तपासण्या रुग्ण बाहेरून खरेदी करू शकत नाहीत, अशा रुग्णांच्या बिलात सवलत देणे किंवा बिल पूर्ण माफ करणे एवढाच पर्याय असतो.
वायसीएम रुग्णालयात दरवर्षी सरासरी ५० हजार रुग्ण आंतररुग्ण कक्षात तर, ४ लाख ५० हजार रुग्ण बाह्यरूग्ण विभागात उपचार घेतात. गरजू रुग्णांना बिलात सवलत दिली जाते किंवा बिल माफ केले जाते. वैद्यकीय क्षेत्रात व तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. आधुनिक उपचारपद्धती, साधने, साहित्य, औषधे या सर्वाचा पुरवठा वायसीएम रुग्णालयात तातडीने करणे शक्य होत नाही. तातडीच्या वेळी दर करारावर उपलब्ध असलेल्या बाबी, औषधे, साहित्य वैद्यकीय तपासण्या आदी गरजू रुग्णांना उपलब्ध करून देणे शक्य व्हावे. तसेच, काही औषध व शस्त्रक्रियासाठी लागणारे साहित्य हे त्या त्या वेळी अशा रूग्णांसाठी उपलब्ध होण्यासाठी रुग्णालय स्तरावर गरजू रुग्ण सहाय्यता निधी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी १६ डिसेंबर २०२४ ला मान्यता दिली आहे.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात तसेच, मुंबईच्या केईएम रूग्णालयात अशी संस्था आहे. त्या धर्तीवर वायसीएम रुग्णालयात ती संस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गरजू रूग्णांच्या उपचारार्थ आर्थिक मदत करू इच्छिणारे देणगीदार, दानशूर व्यक्ती, संस्था, खासगी कंपन्या, मंडळांकडून देगणी, मदत निधी, चेक या संस्थेच्या नावाने स्वीकारले जातील. जमा झालेल्या निधीतून गरजू रूग्णांवर वायसीएम रुग्णालयात उपचार केले जातील. हा निधी केवळ गरजू रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला जाईल. त्यामुळे वायसीएम रुग्णालयावरील आर्थिक ताण बऱ्यापैकी कमी होणार आहे.
या संस्थेत आयुक्त संचालक तथा अध्यक्ष असणार आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्रशासन अधिकारी आणि समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) हे सहा संचालक असणार आहेत. त्याकरीता वायसीएम रुग्णालय गरजू रुग्ण सहाय्यता निधी या नावाने राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतंत्र खाते काढले जाणार आहे. त्या खात्यात तो निधी जमा केला जाणार आहे. त्यासंदर्भात कंपनी सेक्रेटरी जी. जी. परळीकर हे कार्यवाही करीत आहेत. संस्था स्थापनेसाठी तसेच, नोंदणीसाठी २५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. त्याला सर्वसाधारण सभा तसेच, स्थायी समितीची मान्यता देण्यात आली आहे.














