- तब्बल १ हजार ५५६ कोटी खर्चून पवना नदी होणार निर्मळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२५) :- राज्य सरकारच्या पर्यावरण समितीकडून पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास पर्यावरण ना हरकत-ईसी दाखला मिळाला आहे. या अंतिम दाखल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पास गती मिळणार आहे. तब्बल १ हजार ५५६ कोटी रुपये खर्च करून पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेस निधीची तरतूद करावी लागणार आहे.
पवना धरणापासून नदी सुरू होऊन ती दापोडी येथे मुळा नदीत विसर्जित होते. पिंपरी-चिंचवड शहरात किवळे ते दापोडी असे दोन्ही बाजूचे पवना नदीचे पात्र आहे. शहरातून नदीचे २४.४० किलोमीटर अंतर आहे. नदीकाठावर महापालिका, एमआयडीसी तसेच,एमसीसीआयएकडून सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्यात येत आहेत. एसटीपीत प्रक्रिया केलेले पाणी पवना नदीत सोडले जाणार आहे.
प्रकल्पासाठी नदीचा आराखडा अहमदाबाद, गुजरातच्या एचपीसी डिजाईन अॅण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून बनवून घेण्यात आला. तो आराखडा राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या समितीकडे डिसेंबर २०१९ ला पाठविण्यात आला होता, त्या समितीने सुचविलेल्या अनेक त्रुटी दूर करून सुधारित आराखडा वेळोवेळी पाठविण्यात आला. अखेर, साडेपाच वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पर्यावरण समितीने सोमवारी (दि. ७) महापालिकेस ई.सी. दाखला दिला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या पवना नदी प्रकल्पास राज्य शासनाच्या पर्यावरण समितीकडून ई.सी. दाखला मिळाल्याने काम आता सुरू करता येणार आहे. आराखडा तयार करून लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन आहे.
संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता मनपा…










