न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांना केस पेपर काढण्यासाठी ऑनलाइन पेमेंटची सोय नसल्यामुळे रोख स्वरूपात शुल्क भरावे लागते. अनेकदा नागरिकांकडे सुट्टे पैसे नसल्यास कर्मचारी त्यांच्या सोयीसाठी पेपर देतात; मात्र उरलेले पैसे देण्यासाठी काउंटरवर सुट्टे पैसे उपलब्ध होईपर्यंत वाट पाहावी लागते.
काही वेळा औषधे घेण्यासाठी पुन्हा सुट्ट्या पैशांची आवश्यकता भासते. परिणामी नागरिक काउंटरवरच थांबतात किंवा जवळच्या दुकानातून पाण्याची बाटली, बिस्किटे घेऊन सुट्टे पैसे मिळवतात. यामुळे अनावश्यक खर्च वाढतो.
जवळच्या उपहारगृहात जखमी व्यक्ती काही खरेदीसाठी गेल्यास संबंधित व्यक्ती ऑनलाइन पेमेंट केल्यावर दुकानदार आपल्याला रोख पैसे देईलच याची खात्री नसते. त्यामुळे ऑनलाइन पेमेंटचा निर्णय महापालिकेने लवकर घ्यावा, अशी मागणी आता रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून जोर धरू लागली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील दवाखान्यांमध्ये डिजिटल व्यवहार प्रणाली सुरु झाल्यास नागरिकांना सुलभ सेवा मिळू शकतील, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
डिजिटल व्यवहार प्रणाली सुरू करण्यासाठी नॅशनल बँकबरोबर प्रक्रिया सुरू होती. मात्र त्या बँकेचे विलिनीकरण झाल्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे. शिवाय दवाखान्यातून येणारी ठेव इतर विभागांमध्ये वितरित केली जात असल्याने व्यवहार प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनते. तथापि, अकाऊंट विभाग आणि इतर संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य आरोग्य वैद्यकिय अधिकारी, पिं. चिं. मनपा…












