न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०९ जुलै २०२५) :- जे. जे. इस्पितळात कार्यरत असलेल्या एका अविवाहित डॉक्टरने अटल सेतूवरून समुद्रात उडी घेतली आहे. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. बेपत्ता डॉक्टरांचे नाव ओंकार भागवत कवितके (32) असून उलवे पोलिसांकडून समुद्र परिसरात मागील 36 तासांपासून कसून शोध घेतला जात आहे.
वाहतुकीसाठी खुला केल्यापासून आतापर्यंत अटल सेतूवर तीन डॉक्टर, बॅक मॅनेजर, अभियंता अशा उच्च शिक्षितांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. अविवाहित असलेले डॉक्टर ओंकार भागवत कवितके हे कळंबोली-पनवेल मध्ये राहत होते. ते मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. सोमवारी (7) रात्री 9.30 वाजताच्या सुमारास डॉक्टर ओंकार यांनी चारचाकी थांबवून अटल सेतूवरून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून थेट खवळलेल्या समुद्रात उडी घेतली.
अटल सेतू पोलीस कंट्रोल रूममधुन सोमवारी (7) रात्री 9.45 घटनेची माहिती मिळताच न्हावा-शेवा बंदर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या उलवे पोलिसांनी पथकासह घटना स्थळी धाव घेतली. घटनास्थळी होंडा कंपनीची चारचाकी कार आणि व आयफोन आढळून आला. त्यावरून डॉक्टरांच्या कुटुंबियांची माहिती मिळली. कळंबोलीत वास्तव्यास असलेल्या बहीण कोमल लंबाते यांना पोलीस ठाण्यात बोलावून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
बेपत्ता डॉक्टराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी रेस्क्यू टीम, तसेच सागरी सुरक्षा विभागाच्या ध्रुवतारा बोटीची मदत घेतली आहे. मात्र, अद्यापही बेपत्ता डॉक्टरचा शोध लागलेला नाही. दरम्यान, बेपत्ता डॉक्टरबाबत कोणास काही माहिती मिळवून आल्यास तात्काळ उलवा पोलीस ठाण्याशी 02220870670 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उलवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाणी यांनी केले आहे.
















