न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जुलै २०२५) :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता, वेळेवर उपाययोजना न करणाऱ्या आठ कनिष्ठ अभियंत्यांना महापालिकेने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित अभियंत्यांनी समाधानकारक उत्तरे नाही दिली तर शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याची माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी बुधवारी दिली.
महापालिकेच्या बांधकाम विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना पावसाळ्यापूर्वीच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये हलगर्जीपणा दिसून आला. यामुळे अनेक भागांतील नागरिकांनी सोशल मीडियावरून तसेच महापालिकेच्या हेल्पलाइनवरून तक्रारी केल्या होत्या.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील विविध प्रभागांमध्ये नुकत्याच केलेल्या पाहणी दौऱ्यात अनेक रस्त्यांवर खड्डे कायम असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांना खड्डे बुजवण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जात असूनही, काही विभागांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.
तत्काळ कारवाई करत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांकडून लेखी स्पष्टीकरण मागवले आहे. पुढील आठवड्यात पुन्हा एकदा सर्व प्रभागांची पाहणी केली जाणार असून, उर्वरित खड्डे बुजवण्यासाठी विशिष्ट मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतरदेखील हलगर्जी आढळल्यास अधिक कडक कारवाई केली जाईल.
– मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका…











