- औषध खरेदी, साठवणूक व वितरण प्रक्रियेवर उपस्थित केले सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ सप्टेंबर २०२६) :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCMH) आवश्यक व जीवनावश्यक औषधांच्या कथित तुटवड्याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जन अधिकार संघटनेचे अध्यक्ष मजीद शेख यांनी केली आहे. याबाबत त्यांनी YCMH चे डीन यांना निवेदन देऊन औषध खरेदी, साठवणूक आणि वितरण प्रक्रियेची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे.
रुग्णालयात काही आवश्यक औषधे वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कालावधीतील औषधांची मागणीपत्रे, निविदा प्रक्रिया, खरेदी आदेश, पुरवठा नोंदी, बिले व देयके तपासण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रत्यक्ष औषध साठा आणि स्टॉक रजिस्टर, संगणकीय नोंदी व वितरण नोंदी यांची पडताळणी करावी. रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी आणि खासगी मेडिकल दुकानांमध्ये संभाव्य हितसंबंध अथवा संगनमताबाबत तक्रारी किंवा पुरावे असल्यास त्याचीही चौकशी करावी, असे शेख यांनी म्हटले आहे.
चौकशीसाठी आवश्यक CCTV फुटेज व संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवून स्वतंत्र चौकशी समिती गठित करावी. अनियमितता आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कार्यवाही करावी तसेच चौकशीचा निष्कर्ष लेखी स्वरूपात कळवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.


















