- पालिकेच्या शाळा चालविणार ठेकेदार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जुलै २०२५) :- महापालिकेच्या शिक्षण विभागाने सामाजिक दायित्व निधी माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या पाच इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा आकांक्षा फाउंडेशनला दिल्या होत्या. मात्र, आता ही संस्था ठेकेदार बनली आहे. सीएसआर निधीची कमतरता असल्याचे कारण देत. शिक्षण विभागाने प्रथमच शाळा चालवण्यासाठी या कंपनीला निविदा प्रक्रियेद्वारे संधी दिली आहे. सहा शाळा पाच वर्षासाठी चालवण्यासाठी महापालिका तिला ४० कोटी ५३ लाख ७५ हजार रुपये देणार आहे.
श्रीमती अनुसया नामदेव वाघेरे शाळा, पिंपरी, छत्रपती शाहू महाराज शाळा, कासारवाडी, कै. दत्तात्रेय रामचंद्र काळे शाळा, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा, बोपखेल, सावित्रीबाई फुले शाळा, मोशी, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळा, दिघी या त्या सहा शाळा आहेत.
महापालिकेतर्फे बालवाडी ते आठवीपर्यंत मराठी, इंग्रजी, उर्दू व हिंदी माध्यमातील १०५ शाळा चालवल्या जातात. मागील अकरा वर्षापासून आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून पाच प्राथमिक शाळा चालवल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना लॉटरी पद्धतीने प्रवेश दिला जात असल्याचे सांगितले जाते.
महापालिका शाळांमध्ये गरीब व कमजोर घराण्यांतील मुले शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आकांक्षा फाउंडेशनने मागील अकरा वर्षापूर्वी कंपन्यांच्या सीएसआर निधीद्वारे या पाच शाळा प्रायोगिक तत्त्वावर चालवण्यास घेतल्या होत्या. या शाळांतील सर्व खर्च सीएसआर निधीतून केला जात होता. मात्र, हा निधी पुरेसा नसल्याचे ‘आकांक्षा’ने महापालिकेला कळवले. त्यानंतर शिक्षण विभागाने १० जूनला सहा शाळा चालवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली.
सहा शाळांमध्ये ३,४५० विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी वार्षिक खर्च ४७,१२१ रुपये धरला गेला होता. त्यानुसार एका वर्षाचा खर्च १६ कोटी २५ लाख ६७ हजार ४५० रुपये असून, पाच वर्षांसाठी ८२ कोटींची निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदेला दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही आकांक्षा फाउंडेशनची एकमेव निविदा आली आणि तीच पात्र ठरली. या संस्थेने प्रतिविद्यार्थी वार्षिक खर्च २७ हजार रुपये धरून पाच वर्षांसाठी ४० कोटी ५७ लाखांचा खर्च दाखवला. मात्र, शिक्षण विभागाने दर कमी करण्यास सांगितले. त्यानुसार निविदा मंजूर करण्यात आली आहे.
आकांक्षा फाउंडेशनच्या माध्यमातून सीएसआर निधीने पाच प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या शाळा चालवल्या जात होत्या. मात्र, हा निधी कमी पडल्याने यावर्षी प्रथमच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार सहा शाळा चालविण्यासाठी पाच वर्षांसाठी ४० कोटी ५३ लाख ७५ हजार रुपये आकांक्षा फाउंडेशनला देण्यात येणार आहेत.
– संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग…















