न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी (दि. १६ जुलै २०२५) :- हिंजवडीत पदपथ आणि वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे एमआयडीसीकडून काढण्यात येत असून, मंगळवारी (दि. १५) सकाळी आयटी पार्क टप्पा क्रमांक एक ते तीन यादरम्यान धडक कारवाई सुरू करण्यात आली. कट्टे, कच्ची बांधकामे, स्नॅक्स सेंटर, टपरी, पत्राशेड, लोखंडी बॅनर जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आले.
हिंजवडी परिसरात फेज एक हद्दीत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी दहाच्या सुमारास कारवाईस सुरुवात करण्यात आली. जयरामनगर, नारायणनगर, ब्लू रिज, सिम्बॉयोसिस हॉस्टेल, रुबी हॉल तसेच माण हद्दीतील फेज दोनमधील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ता आणि फेज तीन हद्दीत येणाऱ्या मेगा पोलिस, केपीआयटी सर्कल परिसरातील एमआयडीसी हद्दीत येणाऱ्या रस्त्यावर मोहीम राबविण्यात आली.
दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर आणि २० हून अधिक मजुरांसह एमआयडीसीचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला, उपअभियंता नरेश हरियाल, नितीन यादव, सहायक अभियंता नम्रता कसबे, महेश निंबोरकर यांनी ही मोहीम राबविली. आयटी पार्क परिसरात वाहतुकीला अडसर ठरणारी सर्व अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याने, कारवाई सुरूच राहणार आहे.
आयटी पार्क फेज एक ते तीन हद्दीत येणाऱ्या मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांलगतची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाली आहे. पदपथ सुद्धा अतिक्रमणमुक्त केले जात आहेत. मजूर लावून रस्ते, पदपथ स्वच्छ करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी आयटी पार्कमध्ये स्वच्छता अभियान राबविले पाहिजे, असे सांगितले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयटी पार्कमधील पाहणी दौऱ्यात अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या.
















