- म्हाडाच्या अधिकाऱ्यासह बिल्डरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२५) :- म्हाडाने निश्चित केलेल्या तीन सदनिका अत्यल्प उत्पन्न गट (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) या गटातील लाभार्थ्यांना न देता त्या सदनिका खुल्या बाजारात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते आजपर्यन्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कमलराज निशीगंध, दिघी येथिल ३ सदनिका मिळकत येथे घडला.
याप्रकरणी विष्णू चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक, नेमणूक मुख्य दक्षता व सुरक्षा कार्यालय, प्राधिकरण, म्हाडा, मुंबई यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी १) विकासक मे. कमलराज रिअल्टर्स, २) विजयसिंह ठाकूर, मिळकत व्यवस्थापक, पुणे मंडळ (म्हाडा) यांच्या विरोधात दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजने अंतर्गत विकासकाला अत्यल्प उत्पन्न गट (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) या गटातील नागरिकांना परवडणा-या किंमतीमध्ये सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी विकासकाला २० % अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (FSI) UDCPR- २०२० नुसार प्राप्त होतो. परंतु सदर प्रकरणी विकासक यांनी या सदनिकांची खुल्या बाजारात विक्री केली आहे. तसेच विकासकाने २०% अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाचा (FSI) देखील लाभ घेतला. तद्नंतर ज्यांना सदनिका विकल्या होत्या त्यांची नांवे विजयसिंह ठाकूर, मिळकत व्यवस्थापक, पुणे मंडळ यांना कळविली. त्या अनुषंगाने विजयसिंह ठाकूर, मिळकत व्यवस्थापक, पुणे मंडळ यांनी वरील तीन सदनिकांकरीता बनावट देकार पत्रे तयार करून विकासक, मे. कमलराज रिअल्टर्स यांना संगणमत करुन उपलब्ध करून दिली. यामुळे प्रतिक्षा यादीतील अर्जदारांची व शासनाची फसवणूक झाली आहे. पोउपनि कटपाळे पुढील तपास करीत आहेत.












