- आ. शंकर जगताप यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आढावा बैठक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ नोव्हेंबर २०२५) :- चिंचवड मतदारसंघातून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील सेवा रस्त्यांच्या प्रलंबित कामांना आता गती मिळणार आहे. आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अधिकाऱ्यांसमवेत आज चिंचवडमधील पिंपळे गुरव येथील कार्यालयात महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत भुमकर चौक ते ताथवडे, ताथवडे ते पुनावळे अंडरपास आणि मुळा नदी ते भुमकर चौक दरम्यानच्या सेवा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार जगताप यांनी दिले. पावसाळी पाणी निचरा, सांडपाणी वाहिनी, आणि इतर सेवांसाठी डक्ट व्यवस्था उभारण्यावरही त्यांनी भर दिला. तसेच, अपूर्ण जमिनींचे भूसंपादन आणि रस्त्यांची उच्च गुणवत्ता राखण्यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, तांत्रिक व्यवस्थापक अंकित यादव, कार्यकारी अभियंता सुभाष घंटे, समन्वयक विनोद पाटील आणि हरिंद्र यादव उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, “ताथवडे, पुनावळे, वाकड परिसर झपाट्याने विकसित होत आहे. हा भाग हिंजवडी आयटी पार्कच्या जवळ असल्याने वाहतूक दाब मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे सेवा रस्त्यांचे डांबरीकरण आणि सबवे कामे तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “या रस्त्यांची गुणवत्ता अशी असावी की पुढील ५० वर्षांपर्यंत पुन्हा दुरुस्तीची वेळ येऊ नये. नागरिकांना सुसाट वाहतूक सुविधा मिळणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
आमदारांनी सांगितले की, “पुनावळे, ताथवडे आणि वाकड अंडरपास येथे ‘बॉक्स पुशअप’ तंत्रज्ञानाद्वारे कामे हाती घेण्यात येणार असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारात येणाऱ्या या सेवा रस्त्यांची कामे महापालिकेच्या अखत्यारीत नसल्याने, एनएचएआय अधिकाऱ्यांनी ती तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या आहेत. या कामांमुळे वाकड ते मामुर्डीपर्यंतचा रस्ता खरोखरच ‘सुसाट’ होईल.”











