- पिंपरीत चालकावर तलवारीने हल्ला; दोन तरुणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी पुलाखालील पानटपरी परिसरात दोन तरुणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात ३३ वर्षीय चालक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांखाली गंभीर गुन्हा नोंदवला आहे.
घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता पिंपरी पुलाखाली घडली. फिर्यादी आकाश गायकवाड पानटपरीजवळ उभे असताना आरोपी राहुल लखन आणि साहिल बहोत हे त्यांच्याजवळ आले. “आमच्या विरोधात तक्रार करणार?” असे म्हणत आरोपींनी वाद घालत फिर्यादीला धमकावले.
त्यापैकी राहुल लखनने शर्टाखाली लपवलेली धारदार लोखंडी तलवार काढून फिर्यादीच्या छातीवर वार केला. तो वार चुकवण्याचा प्रयत्न करताना पीडिताच्या काखेजवळ घाव लागून गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने तलवार हिसकावून पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत फिर्यादीच्या बरगडीवर जोरदार वार बसला.
हल्ल्यानंतर दोघांनी तलवार हवेत फिरवत “हम यहा के भाई है, किसके दम है तो बाहर आओ” असे ओरडत दहशत निर्माण केली आणि घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि अनिल लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपी अद्याप अटकेत नाहीत.












