न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- सांगवी आणि वाकड पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने दोन स्पा सेंटरवर छापे टाकत कारवाई केली. या दोन्ही स्पा सेंटरमधील अनैतिक प्रकारांची खात्री झाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यांना एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश दिले.
सांगवी परिसरातील कुणाल आयकॉन रोडवरील “NEW OM SPA” येथे छापा टाकून आरोपी आकाश साळवे आणि संदीप तिवारी यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. स्पा सेंटरच्या आजूबाजूला सार्वजनिक ठिकाण असूनही वेश्याव्यवसाय चालवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्पा बंद करण्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयात पाठवला होता.
तसेच वाकड येथील काळेवाडी फाटा परिसरातील “RUPEN SPA” येथे छाप्यात महिला आरोपी हिच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तिच्या विरोधातही स्पा सेंटरच्या बाहेर सार्वजनिक जागा असूनही बेकायदेशीर व्यवसाय चालवल्याचा आरोप करण्यात आला.
दोन्ही प्रकरणातील कागदपत्रे आणि चौकशी अहवाल तपासल्यानंतर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ७ नोव्हेंबर २०२५ पासून पुढील एक वर्षासाठी दोन्ही स्पा सेंटर बंद करण्याचे आदेश जारी केले.
या कारवाईमुळे अशा बेकायदेशीर व्यवसायांना लगाम बसण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.












