न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेने पावसाळ्यात शहरातील खड्डे भरण्यासाठी ‘पॉटहोल मॅनेजमेंट अॅप’ तयार केले आहे. इंफ्रा प्रोजेक्ट्स इंडिया प्रा. लि.च्या सहकार्याने हे अॅप विकसित करण्यात आले असून त्याचा उपयोग रस्त्यांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी केला जाणार आहे. मुळात सर्व उपाययोजना असूनही रस्त्यावर खड्डे पडल्यास जबाबदारी कोणाची, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. प्रणाली यशस्वी ठरेल का, हे प्रत्यक्ष अंमलबजावणीतूनच समजेल.
महापालिकेच्या स्थापत्य, पाणीपुरवठा, जलनिःसारण व दळणवळण विभागातील १५७ अभियंत्यांना ऑटो क्लस्टर येथे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. खड्डे शोधण्यापासून ते तत्काळ निराकरणापर्यंतच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन यामध्ये करण्यात आले.
“खड्डे नोंदणी व निराकरण प्रणाली” वर खड्ड्यांबाबत तक्रार आल्यानंतर कार्यवाही करण्यासाठी अभियंत्यांना देखील या प्रणालीची माहिती असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणात जलनिरोधक तंत्रज्ञान, वेगवान प्रतिसाद यंत्रणा व विविध विभागांत समन्वयाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यामुळे पावसाळ्यातील खड्ड्यांचे प्रमाण कमी होईल, असा दावा महापालिकेचा आहे.















