- पदपथ, सायकल ट्रॅकवर अतिक्रमण..
- रस्त्यावरच गवत व कचऱ्याचे साम्राज्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाल्हेकरवाडी (दि. २३ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मोठ्या गाजावाजात आणि जाहिरातबाजी करत ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’ या नावाखाली वाल्हेकरवाडी परिसरात रस्त्यांचे सुशोभीकरण केले होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पदपथ, सायकल ट्रॅक, हिरवळ, झाडांचे कुंपण आणि सौंदर्यीकरण यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र प्रत्यक्षात या रस्त्यांची अवस्था पाहता हा सारा प्रकल्प अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे जाणवते. नियोजनशून्यता, देखभालीचा अभाव आणि नागरिकांच्या सहभागाचा अभाव यामुळे हा संपूर्ण प्रकल्प सध्या उपहासाचा विषय बनला आहे.
पदपथ हे नागरिकांच्या चालण्यासाठी असूनही तेथे सध्या दुकानांमध्ये आलेल्या ग्राहकांची वाहने रांगेत लावली जात आहेत. दुकानदारांनीही आपल्या मालाच्या स्टोरेजसाठी पदपथाचा वापर सुरू केल्यामुळे पादचारी नागरिकांना रस्त्यातून चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. सायकल ट्रॅक देखील अडथळ्यांनी भरलेला असून, अनेक ठिकाणी त्याचा पुरेपूर उपयोग होत नाही. यामुळे पर्यावरणपूरक प्रवासाचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
रस्त्याच्या कामातही निष्काळजीपणा दिसून येतो. काही ठिकाणी रस्ता अर्धवट सोडल्याने चिखल साचला आहे. त्यावर गवत उगवले असून, रस्त्याचे सौंदर्य पूर्णपणे हरवले आहे. रस्त्याच्या कडेला व झाडांच्या कुंपणांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे, त्यामुळे डास आणि इतर कीटकांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, कुंपणाच्या आसपास प्लास्टिक, कचरा व अन्नपदार्थांची विक्री करून ठिकठिकाणी घाण केली जात आहे.
महानगरपालिकेने या प्रकल्पाचे उद्घाटन करताना नागरिकांना पायी चालण्यासाठी, सायकलने प्रवास करण्यासाठी आणि सुंदर रस्त्यांचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात कुठलीही देखरेख न केल्यामुळे आणि कठोर अंमलबजावणी न झाल्यामुळे या संकल्पनेला हरताळ फासलेला आहे. नागरिकांकडूनही या प्रकल्पावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तत्काळ सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे. तसेच ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’ प्रकल्प हा फक्त आकर्षक संकल्पनांपुरता मर्यादित राहिला असून, त्याची अंमलबजावणी आणि देखभाल यामध्ये पालिकेच्या अपयशाची स्पष्ट झलक दिसते. जर वेळेत सुधारणा केल्या नाहीत, तर हा प्रकल्प नागरिकांच्या कराच्या पैशांची उधळपट्टीच ठरणार, अशी टीका नागरिकांकडून होत आहे.












