न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२५) :- संत तुकारामनगर येथील बुद्ध विहाराच्या शेजारच्या चारमजली इमारतीवर महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बुधवारी कारवाई केली. या कारवाईत इमारतीवरील दोन अनधिकृत मजले आणि तळमजल्यावरील दुकानावर कारवाई करत अंदाजे १५०० चौरस मीटरचे बांधकाम पाडण्यात आले. या कारवाईमुळे इतर अनधिकृत बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता सुनील बेळगावकर, संदीप हजारे, बीट निरीक्षक विक्रम चव्हाण, रोहन कांबळे, शुभांगी चंदनकर, शहाबुद्दीन बागवान, प्रफुल्ल भोकरे यांच्यासह संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.
येथील रहिवासी रमेश झेंडे यांच्या मालकीची चारमजली इमारतीपैकी वरील दोन मजले आणि तळमजल्यावरील दुकानावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करून एकूण १५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर ही अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू असताना मोठी गर्दी झाली होती.
महापालिकेने अनधिकृत बांधकामाविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाचे बिट निरीक्षक विक्रम चव्हाण म्हणाले, या इमारतीचे बांधकाम सुरू असताना सुरुवातीला घरमालकाला नोटीस दिली होती. यानंतर मे महिन्यातही त्यांना घर खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती.
अतिक्रमण कारवाई ठराविक इमारतीवर करण्यात येत असल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते, माजी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या कारवाईला विरोध केला. माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, सुलक्षणा शिलवंत – धर, पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजेश वाबळे, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक संतोष म्हात्रे, मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत मोरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्ष वर्षा जगताप आदी कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












