- जुन्या १७ पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात रेल्वे मार्ग, नदी, चौक आणि महामार्गावर वाहतुकीच्या सुविधेसाठी महापालिकेच्या वतीने ४६ ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. यामध्ये २० वर्षांहून अधिक आयुर्मान झालेल्या १७ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट (संरचनात्मक लेखापरीक्षण) करण्यात येणार आहे.
गेल्या महिन्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने सुरक्षेसाठी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहर १८१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर वसले आहे. शहराच्या चहूबाजूस ये-जा करण्यासाठी तसेच, सुरळीत रहदारीसाठी महापालिकेने प्रशस्त रस्त्यांसोबत पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीवर तसेच, रेल्वे मार्ग आणि रस्त्यांवर, चौकात उड्डाण पूल बांधले आहेत. शहरातील विविध भागात ४६ पूल उभारले आहेत. यामधील २९ पूल हे २० वर्षपिक्षा कमी कालावधीचे आहेत. सतरा पुलांचे २० वर्षांहून अधिक आयुर्मान झाले आहे.
दापोडीतील पुण्याकडून पिंपरी चिंचवडकडे येताना हॅरिस ब्रिज इंग्रजांच्या काळात म्हणजे सन १८९५ मध्ये बांधला आहे. त्याच ठिकाणी समांतर पूल पुणे महापालिकेने सन १९८७ मध्ये उभारला आहे. वाहतुकीचा ताण वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने तेथे सन २०१९ मध्ये आणखी दोन समांतर पूल उभारले आहेत. चिंचवडमधील रेल्वे पूल सन १९७८ मध्ये तर, पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल १९८३ मध्ये उभारला आहे.
हॅरिस ब्रिज, पिंपरी आणि चिंचवड अशा तिन्ही पुलांचे महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. ऑडिटनुसार पुलांची दुरुस्ती करून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आता फक्त १७ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे, त्यासाठी सल्लागाराची नेमणूक करून निविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही सुरू असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला महापालिका प्रशासनाने कळविले आहे.
शहरात रेल्वे मार्ग, नदी, चौक आणि महामार्गावर ४६ ठिकाणी पूल आणि उड्डाण पूल आहेत. यामधील २९ पुलांचे आयुर्मान २० वर्षांच्या आतील आहे. तर, १७ पुलांचे आयुर्मान २० वषपिक्षा अधिक आहे. या १७ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे, असे महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.
नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पूल, निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातील रोटरी उड्डाण पूल, भोसरी, चिंचवड गाव, थेरगावातील डांगे चौक येथील उड्डाणपूल हे शहरातील मोठे पूल आहेत. पिंपरी गाव-पिंपळे सौदागर (दोन पूल), दापोडी-फुगेवाडी, दापोडी-बोपोडी, दापोडी-सांगवी, दापोडी-पिंपळे गुरव, बोपखेल-खडकी, सांगवी-स्पायसर महाविद्यालय, सांगवी-पुणे विद्यापीठ, निगडीतील टिळक चौक, स्पाईन रस्ता, चिंचवड गावातील मोरया मंदिराशेजारी, चिंचवड गाव ते बिर्ला रुग्णालय, चिंचवड स्टेशन (दोन पूल), चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाण पूल, बिजलीनगर, वाकड-हिंजवडी, निगडी-रावेत, सांगवी फाटा-औंध, तळवडे-निघोजे, कासारवाडी पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, कुदळवाडी, चिंचवड गावातील बटरफ्लाय पुलासह शहरात ४६ उडूणपूल आहेत. पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म आणि पिंपळे निलख-बाणेर येथील पुलाचे काम सुरू आहे.












