न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चांदखेड (दि. २४ जुलै २०२५) :- गोडुंब्रे ग्रामपंचायतीच्या पहिल्या लोकनियुक्त महिला सरपंच निशा गणेश सावंत यांना सरकारी गायरान जमिनीवरील कथित अतिक्रमणाच्या प्रकरणात अपात्र ठरवण्याचा जिल्हाधिकारी, पुणे यांचा आदेश अखेर अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे कविता द्विवेदी यांनी रद्द केला असून, त्यामुळे सावंत यांचे सरपंच पद कायम राहणार आहे.
गावातील कल्पना हेमंत सावंत यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, सरपंच निशा सावंत यांचे सासरे गोपाळ बबन सावंत यांनी तीन गुंठ्यांमध्ये सरकारी गायरान जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केले असल्याचा आरोप होता. या तक्रारीच्या अनुषंगाने मंडल अधिकारी आणि तहसीलदार, मावळ यांचा अहवाल प्राप्त करून जिल्हाधिकारी पुणे यांनी निशा सावंत यांना सरपंचपदासाठी अपात्र ठरवले होते. मात्र, या निर्णयाविरोधात सावंत यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील दाखल केले. तपासणी विभागीय दरम्यान अतिरिक्त आयुक्त द्विवेदी यांनी कागदपत्रांची व जमीन गट क्रमांकांची सखोल पडताळणी केली. या अहवालानुसार, तीन गुंठ्यातील बांधकाम हे सरकारी गायरान गट क्रमांक ३१ मध्ये नसून, सावंत कुटुंबाच्या मालकीच्या गट क्रमांक ६१ मध्ये असल्याचे स्पष्ट झाले.
या संदर्भात निर्णय देताना, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत निशा गणेश सावंत यांना सरपंच पदावर कायम ठेवण्याचे निर्देश कविता द्विवेदी यांनी दिले. या निर्णयामुळे निशा सावंत यांना मोठा दिलासा मिळाला असून, गावकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.












