न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जुलै २०२५) :- पिंपरी येथील एका अकाउंटंटची तब्बल ₹५७,७०,६७० ची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी टी. चिंदु सुबुधी (वय ३७, रा. पिंपरी) यांनी पिंपरी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी रवी कुमार शर्मा, “Abbott Wealth” अॅप आणि काही अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
१७ मार्च २०२५ ते २२ मे २०२५ या कालावधीत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून फिर्यादीला आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून ‘Abbott Wealth’ अॅपवर नोंदणी करण्यास सांगण्यात आले. नंतर गुंतवणूक केलेले पैसे परत मिळवण्यासाठी विविध चार्जेस भरण्यास भाग पाडण्यात आले. अशा प्रकारे फिर्यादीकडून एकूण ₹५७.७० लाख उकळण्यात आले.
या आर्थिक फसवणुकीप्रकरणी निष्पन्न आरोपी शिवम बाळकृष्ण संवत्सरकार (वय ३३, रा. एरंडवणे, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१६(२), ३१८(४), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(सी), ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पोनि रविकिरण नाळे पुढील तपास करत आहेत.












