- मंजूर विकास योजनेसाठी महापालिकेकडे क्षेत्र वर्ग करण्यास मुख्यमंत्र्यांकडे तगादा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २७ मे २०१९) :- भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी स्थानिक नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात अडथळा निर्माण होवू नयेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”मोशी येथील गट नं. (जुना ३२५) ३२७ येथील शासकीय गायरान जमिनीवर पिंपरी चिंचवड महापालिका मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्र. १/२०८ मनोरंजन केंद्र, आरक्षण क्र. १/२०९ अ प्रशासकीय व बहुउद्देशीय इमारत आरक्षण क्र. १/२०७ सफारी पार्क यासह १२ मीटर व १८ मीटर रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत.
संबंधित गायरान जमीन पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतर करण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, महसूल व वन विभागाच्या वतीने मोशीतील एकूण ७७.०१ हेक्टर क्षेत्रापैकी २. ५४ हेक्टर आर क्षेत्र भाडेकराराने पुणे महापालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू आहेत. मात्र, संबंधित जागेवर पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत.
त्यामुळे ही जागा पुणे महापालिकेस घनकचरा व्यवस्थानासाठी देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी आमदार लांडगे यांनी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.











