न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २५ जुलै २०२५) :- शिरगाव (ता. मावळ) येथील एका सोसायटीतील ३५ वर्षीय महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तब्बल ₹१९.८१ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात राकेश रविकुमार शेट्टी (रा. जुना केट रोड, मंगलोर, जि. दक्षिण कन्नड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दि. १७ नोव्हेंबर २०२४ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत पीडित महिलेला jeevansathi.com या मॅट्रिमोनी संकेतस्थळावरून प्रोफाइलद्वारे संपर्क करण्यात आला. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि फोन व मेसेजच्या माध्यमातून जवळीक वाढवली. यानंतर आरोपीने फिर्यादीकडून तिचे क्रेडिट कार्ड, बँकिंग अॅप व विविध लोन अॅपची माहिती मिळवून, वेळोवेळी आर्थिक व्यवहार करत एकूण ₹१९,८१,७५१/- ची फसवणूक केली.
या प्रकरणी भा.न्या.संहिता कलम ३१६(२), ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक शेख पुढील तपास करत आहेत. नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.











