न्यूज पीसीएमसी नेटवर्क
आळंदी (दि. २६ जुलै २०२५) :- आळंदी देवाची येथील देहू फाटा परिसरात बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आळंदीचे उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले व ग्रामस्थांनी केली.
शेतकरी सुभाष दाभाडे यांना त्यांच्या शेतात बिबट्या व त्याचे दोन बछडे काही अंतरावर दिसून आले. विशेष म्हणजे, या बिबट्याने त्यांच्या घरातील दोन कुत्र्यांवर हल्ला केला असून, परिसरात त्याच्या उपस्थितीची ठोस चिन्हे आढळली आहेत. पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर या भागात होत असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम गुरुवारी (दि. २४) दुपारी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी घटनास्थळी पाहणी करताना बिबट्याच्या पावलांचे ठसे पाहिले असून, परिसरात दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
शेतात एकट्याने न जाणे, हातात काठी घेणे, संध्याकाळी उशिरा शेतात थांबू नये अशा सूचना वन विभागाकडून नागरिकांना देण्यात आल्या आहेत. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. वन विभागाने नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या.











