न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे गुरव (दि. २६ जुलै २०२५) :- महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३० मधील दापोडीतील बुद्ध विहार व स्मशानभूमी परिसरात असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी सकाळी कारवाई करण्यात आली. अनधिकृत पत्राशेड, भंगार दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.
दापोडीतील अनधिकृत पत्राशेड, भंगार दुकाने यावर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करत एकूण क्षेत्रफळ १३,५०० चौरस मीटरचे पत्राशेड, भंगार दुकानांवर हातोडा मारण्यात आला. महापालिकेचे उपआयुक्त अतुल पाटील, ‘ह’ प्रभाग क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली.
कनिष्ठ अभियंता संदीप हजारे, शुभांगी चंदनकर, प्रफुल्ल भोकरे, विक्रम चव्हाण, रोहन कांबळे, शाबोद्दिन बागवान, पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. दोन पोकलेन, १० जेसीबी, आठ महापालिका मजूर, १० कंत्राटी मजूर, ३८ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, तीन कॅमेरामन यांच्या सहकार्याने करण्यात आली. कारवाईवेळी दापोडी पोलिस ठाण्यातील पोलिसांचाही बंदोबस्त तैनात करण्यात आला.











