- पोलीस अधिकाऱ्यास शिवीगाळ व धक्काबुक्की…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २८ जुलै २०२५) :- भोसरीतील पीएमटी चौकाजवळ २७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.२५ च्या सुमारास मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्या एका वाहनचालकाविरुद्ध भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनय नवनाथ चौधरी (वय २९, रा. देवकर वस्तीकॉलनी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आरोपीचे नाव असून त्याने मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याची तक्रार आहे.
पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार दगडगावे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी विनय चौधरी याने एमएच 14 एमके ००९३ क्रमांकाची मोटार दारूच्या नशेत चालवत मोठमोठ्याने आरडाओरड केली आणि वाहतुकीस अडथळा निर्माण केला. पोलिसांनी हस्तक्षेप करताच त्याने पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली व धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १३२, २८५, ११५(२), ३५२ सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ आणि मोटार वाहन कायदा कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास मसपोनि दशवंत करीत आहेत.












