न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. २८ जुलै २०२५) :- ध्यान साधनेतून विद्यार्थी जीवनातील एकाग्रता, प्रगती, आत्मविश्वास, सद्भावना वृद्धींगत होते. जीवन तणावमुक्त व आनंदमयी होते यासाठी विद्यार्थी दशेपासूनच नित्यनियमाने रोज ध्यानधारणा करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पु. जि. परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी राजेश खंदारे यांनी केले.
श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शनिवार, दि. २६/०७/२०२५ रोजी ‘मित्र’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विपश्यना आनापान शिबिराचे निमित्ताने ‘आनापान या ध्यान साधनेतून साधू या मनाची एकाग्रता’ या विषयातून खंदारे सर यांनी इ. पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांची ध्यान साधना घेण्यात आली. डोळे बंद करून फक्त श्वासांवर लक्ष ठेवण्याचे सोपे कामसुद्धा ध्यान साधनेत अवघड आहे, याचा प्रत्यय विद्यार्थ्यांनी घेतला. पण या ध्यान साधनेच्या सातत्यातून ही अवघड वाटणारी गोष्ट सरावाने सहज साध्य होते. शाळेत आल्यावर दहा मिनिटे व शाळा सुटल्यावर दहा मिनिटे ध्यान साधना करणे आवश्यक आहे. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठीही ध्यान साधना महत्वाची ठरते. विद्यार्थी अवस्थेत जर ध्यानाचे महत्व कळले तर अंगी सजगता येते व मनाचे सबलीकरण होते, असे विचार याप्रसंगी श्री. खंदारे सर यांनी व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना जीवनातील सर्वांगीण विकासासाठी नित्य ध्यानधारणा करण्यासाठी प्रेरित केले.
याप्रसंगी राजेश खंदारे, त्यांच्या मातोश्री वेणूताई खंदारे, पत्नी आरती खंदारे उपस्थित होत्या. तसेच शाळेच्या उपप्राचार्या शैलजा स्वामी, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, सचिव प्रा. विकास कंद, शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विकास कंद यांनी व सूत्रसंचालन सहशिक्षिका वृषाली आढाव यांनी केले.












