- पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड मूसा ठार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
श्रीनगर (दि. २८ जुलै २०२५) :- जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरजवळील लिडवास परिसरात भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत मोठी दहशतवादविरोधी कारवाई करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ही कारवाई पहलगाम हल्ल्याचा बदला मानली जात असून, ठार झालेल्यांमध्ये त्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मूसा याचाही समावेश आहे. या यशस्वी कारवाईमुळे दहशतवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनंतर भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने 28 जुलैच्या पहाटे लिडवास आणि दाचीगामच्या जंगलांमध्ये वेढा घातला. काही दहशतवादी या भागात लपून बसल्याची खात्री झाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने दोन्ही बाजूंमध्ये भीषण चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलांनी अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत तीन दहशतवाद्यांना ठार केले.
सुरक्षा दलांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांचा संबंध लष्कर-ए-तोयबाच्या उपशाखा असलेल्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या संघटनेशी होता. हे दहशतवादी नुकत्याच झालेल्या पहलगाम हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ दहशतवादविरोधी कारवाई न राहता, पहलगाम हल्ल्याचा जोरदार प्रत्युत्तर म्हणूनही पाहिली जात आहे.
‘ऑपरेशन महादेव’च्या माध्यमातून सुरक्षा दलांनी TRF संघटनेच्या घातकी कारवायांना मोठा धक्का दिला आहे. या कारवाईत पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंड मूसा याचा खात्मा झाल्याने लष्कराला मोठे यश मिळाले आहे.
सध्या चकमक थांबली असली, तरी काही दहशतवादी अद्याप जंगलात लपून बसले असण्याची शक्यता लक्षात घेता लष्कराची शोधमोहीम सुरूच आहे. परिसराची सखोल तपासणी सुरू असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून, सुरक्षा दलांचे मनोधैर्यही उंचावले आहे. आज संसदेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा होत असताना ‘ऑपरेशन महादेव’च्या यशस्वी कारवाईची माहितीही लष्कराच्या पत्रकार परिषदेत जाहीर केली जाणार आहे.












