- भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२५) :- उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी आयटी पार्क परिसरात नुकतीच विकासकामांची पाहणी केली. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पालकमंत्र्यांकडे महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत.
त्यांनी सांगितले की, निगडी येथील पीसीएमसी कॉलनीतील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे जीवन धोक्यात आहे. या इमारतींमध्ये स्लॅब तुटलेले, दरवाजे-खिडक्या व जिने मोडकळीस आलेले असून भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. महानगरपालिकेने या इमारतींना ‘धोकादायक’ घोषित केले असतानाही अद्याप नागरिकांचे स्थलांतर केलेले नाही. ही वस्ती चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती. त्यानंतर इमारतींची कोणतीही मोठी दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
याशिवाय, निगडी सेक्टर २२ मधील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुल इमारतींचा प्रश्नही गंभीर आहे. या इमारती बांधून १४-१५ वर्षे उलटली असूनही ९२० पात्र लाभार्थ्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. संबंधित भूखंड रेड झोनमध्ये असल्यामुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, ही स्थगिती उठवण्यासाठी महापालिकेने आजवर कोणतेही ठोस कायदेशीर पावले उचललेली नाहीत. उलट, करोडो रुपये खर्च करून कायदेशीर सल्लागारांना दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, निगडी ते रावेत बीआरटी मार्गाचे कामही अर्धवट सोडण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या सर्व प्रकरणात महापालिका प्रशासनाचे अपयश स्पष्ट असून, प्रशासक म्हणून गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेले आयुक्त शेखर सिंह यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी सचिन काळभोर यांनी अजित पवार यांच्याकडे केली.














