- चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. २९ जुलै २०२५) :- काळेवाडी, पुणे येथे एका विवाहितेने सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. ३१०/२०२५) दाखल करण्यात आला आहे. घटना २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० ते १२.३० च्या दरम्यान प्रेरणा बँकेजवळ, ज्योतीबानगर येथे घडली.
फिर्यादी प्रकाश वाघमारे (वय ३३, रा. तळवडे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मयत बहिण (वय ३०) हिचा विवाह आरोपी परमेश्वर वाघमारे (रा. लातूर) याच्याशी झाला होता. विवाहानंतर केवळ तीन वर्षातच सासरच्या लोकांनी घरासाठी आणि दुचाकी खरेदीसाठी माहेरहून पैसे आणावेत, यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला होता.
ती कामास जाऊ लागल्यानंतर तिच्या चारित्र्यावरून संशय घेऊन आरोपी परमेश्वर, तीची सासू , दिर कमलाकर आणि नणंद यांनी तिला वेळोवेळी शिवीगाळ, मारहाण करत मानसिक त्रास दिला. अखेर या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०८, ८५, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास मसपानि कोरडे करीत आहेत.












